स्वागतासाठी फुले, खाऊ, दप्तर, पुस्तके, इतरही वस्तूंची भेट! पहिल्याच दिवशी खासगी, महापालिका शाळांमध्ये किलबिलाट

तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर खासगी तसेच मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा चिलबिलाट पाहायला मिळाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताची फुले, चॉकलेट, दप्तर, पुस्तके आणि इतर वस्तूंच्या भेटीमुळे मुलांचे चेहरे आनंदाने फुलले. दरम्यान, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज बोरिवलीतील पोयसर महापालिका शाळेत प्रवेशोत्सवात भाग घेत मुलांना चॉकलेट देत त्यांचे स्वागत केले. यावेळी शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.

खासगी शाळांसह मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या आज पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सजवलेल्या शाळा आणि वर्ग खोल्या, येणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प आणि चॉकलेट, ढोल-ताशांचा निनाद, लेझीम नृत्य, पहिल्याच दिवशी नवे कोरे दप्तर, वह्या-पुस्तके व इतर शालोपयोगी वस्तूंची भेट यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

बोरा बाजार येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली. सैनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच शालोपयोगी साहित्याचे वितरणदेखील करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, ए विभागाचे साहायक आयुक्त जयदीप मोरे उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी या शाळेत आमदार अनंत (बाळा) नर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे संचालक सहदेव सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांवर पुष्पवृष्टी करून मुलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपकार्याध्यक्ष अशोक परब, सीईओ दीपक खानविलकर, सहखजिनदार विजय खामकर, कार्यकारिणी सदस्य सुशील चव्हाण, मुख्याध्यापक जगदीश सूर्यवंशी, आरजेएमडी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे, नेत्रा दळवी, शाखाप्रमुख मंदार मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आजपासून मुंबईतील शाळेचे नवे सत्र सुरू झाले. यावेळी शीव येथील बाबासाहेब देशपांडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत जी-दक्षिण विभागातील प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी शाळेचा प्रवेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्याने स्वागत करून त्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शाखाप्रमुख संजय भगत, सामाजिक कार्यकर्ते किसन सारंग, नंदकुमार तळाशिलकर, शिक्षण परिषदेच्या अर्चना जोशी, मुख्याध्यापक किरण पाटील, अरविंद खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक धनगर यांनी केले.