स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग, चिपळूणमध्ये संतापाची लाट

चिपळूणमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या एका घृणास्पद घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका खासगी शाळेतील व्हॅन चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वहाब खालिद वावेकर असे या आरोपीचे नाव आहे.नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ही विद्यार्थिनी व्हॅनमधून घरी जात असताना, व्हॅन चालकाने आपल्या जबाबदारीचा गैरफायदा घेत तिचा विनयभंग केला.

वहाब खालिद वावेकर हा शाळकरी मुलींना गेली अनेक वर्षे ने आण करण्याचे काम करत होता. मात्र बुधवारी त्याच्या मनात काहीतरी वेगळाच डाव शिजत होता. शाळकरी मुले सुटल्यानंतर त्यांना नेण्यासाठी त्याने गाडी लावली. साऱ्या मुली गाडीत चढल्या. त्याने मुलींना घरोघरी सोडले सुद्धा मात्र एका मुलीला त्याने गाडीतच ठेवले होते. यानंतर त्या मुलीला घरी सोडण्याच्या उद्देशाने गाडीत तिचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरदार आरडाओरडा केल्यानंतर तो घाबरला. त्याने गाडीतून तिला घरी सोडले. मात्र घरी गेल्यानंतर घाबरलेल्या मुलीला पाहून आई वडील चिंतेत पडले. त्यांनी तिला याबाबत विचारणा केली असता तिने सारा प्रकार सांगितला. संतापलेला आई वडिलांनी मुलीला घेऊन ताबडतोब चिपळूण पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनाही तपासाची चक्रे गतिमान केली. वावेकर याला अटक केली. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आरोपी व्हॅन चालकाला तत्परतेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीवर ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण’ (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलेला आरोपी चिपळूण शहरातीलच रहिवासी असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.