तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा दिवाळी सुट्टीनंतर, सहामाही परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school-exam

21 ऑक्टोबरला होणार्‍या विधानसभा निवडणुकीमुळे शाळांमधील सहामाही परीक्षांचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. निवडणुकीपूर्वी होणारे तीन दिवसांचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस असे एकूण चार दिवस वाया जात असल्याने शाळांना सहामाही परीक्षेचे नियोजित वेळापत्रक बदलावे लागणार आहे. 23 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होत असल्याने त्यापूर्वी लेखी परीक्षा घेऊन तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्‍या सत्रात घेण्याचे शाळांनी ठरविले आहे.

दिवाळीच्या सुट्टीपूर्वी शाळांमध्ये सहामाही परीक्षा घेण्यात येते, परंतु यंदा दिवाळीआधी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ठरल्याने त्याचा परिणाम शाळांमधील परीक्षांवर झाला असून यंदा आठवडाभर आधीच परीक्षा होणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना निवडणूक ड्युटी लावण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्र म्हणून मतदानाच्या दोन दिवस आधीच शाळांचा ताबा निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार असल्याने सहामाही परीक्षांचे वेळापत्रक हे दिवस सोडून शाळांना आखावे लागणार आहे.

शिक्षकांवर प्रशिक्षणाची सक्ती नको

यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा या निवडणुकीसाठी शिक्षकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येऊ नये, असे मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात शाळांच्या हातात फारच कमी दिवस राहिल्याने या काळात फक्त लेखी परीक्षाच घेण्यात येईल. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा द्वितीय सत्रात घेण्याचा निर्णय काही मुख्याध्यापकांनी घेतल्याचेही रेडीज म्हणाले. त्यामुळे यंदा निश्चितच परीक्षांच्या निकालाही उशीर होणार आहे.

अकरावीत उशिराने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून उशिराने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र बुडणार आहे. अकरावीच्या शिक्षकांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आल्याने हे शिक्षक वर्गाबाहेरच असणार आहेत. 21 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे उशिराने अकरावी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसर्‍या सत्रातच कॉलेजला हजेरी लावता येणार आहे.