स्क्रॅप व्यवसायिकाकडे खंडणी मागून गोळ्या घालण्याची धमकी

स्क्रॅप व्यवसायिकाकाडून 2 लाखांची खंडणी मागून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. तर दोघे पसार झाले आहेत.

राहुल जाधव (वय 29, रा शिंदेवाडी लोहगाव) आणि योगेश चांदणे (वय 28, रा. विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. रामा माने (वय 30, चंदननगर) व प्रवीण गुलाब जाधव (वय 27 रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) हे फरार झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 34 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे.

फिर्यादी खराडी आयटी पार्क परिसरात स्क्रॅप विक्रेते आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. संबधित व्यक्तीने “तुला धंदा करायचा असेल तर 5 पेटी दे, नाहीतर गोळ्या घालील” अशी धमकी देत खंडणीची मागणी केली होती. व्यावसायिकाने तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

त्यानंतर फिर्यादी यांना 2 लाख रुपये देतो, असे सांगत त्यांना संपर्क ठेवण्यास सांगितले. त्यानुसार आज गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याणी नगर परिसरात फिर्यादी यांच्याकडून २ लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यात आणखी दोघांचा समावेश असल्याचे आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी संपत अवचरे, विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या