
दिल्लीतील स्फोट आणि फरिदाबाद, जम्मू-कश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर जप्त केल्याच्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा येथे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली.
काही दिवसांपूर्वी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून कोंढव्यातून संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला एटीएसने अटक केली होती. दिल्लीतील एटीएसने बुधवारी कोंढवा भागातील संशयितांची चौकशी सुरू केली आहे. एटीएसने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच जुबेरला अटक केली. तेव्हा 9 ऑक्टोबरला कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. कारवाईनंतर जुबेर चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. जुबेर मूळचा सोलापूरचा असून त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (14 नोव्हेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुबेरच्या घरातून 35 हजारांची रोकड जप्त
जुबेरच्या साथीदाराच्या घरातून दोन लाख 35 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोणी दिली तसेच त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, या दृष्टीने तपास सुरू आहे. जुबेरच्या संपर्कात असलेल्या 18 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला आहे.
पाकिस्तान, सौदी, कुवेत, ओमानमधील नंबर
जुबेर वापरत असलेला जुना मोबाईल त्याच्या साथीदाराच्या घरातून जप्त केला आहे. त्या मोबाईलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमानमधील पाच जणांचे संपर्क क्रमांक आहेत. त्याला अटक झाल्याची माहिती मिळताच दहशवादी विचारधारेचा प्रसार करणारी पुस्तके, अन्य कागदपत्रे काळेपडळमधील मदरशाच्या मोकळ्या जागेत जाळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याच्या मोबाईल, लॅपटॉपमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. लॅपटॉपमध्ये काही पीडीएफ फाईल, सोशल मीडियावर संवादात काही सांकेतिक शब्दांचा वापर झाल्याची शक्यता आहे.
तपासाची धुरा विजय साखरे यांच्याकडे
दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. या तपासासाठी एनआयएने ‘स्पेशल 10’ पथक तयार केले असून त्या पथकाचे नेतृत्त्व आयपीएस अधिकारी विजय साखरे हे करणार आहेत. विजय साखरे हे 1996 च्या तुकडीचे केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी नागपूरच्या व्हीएनआयटी येथून बी.टेक तर आयआयटी दिल्ली येथून एम. टेक केले आहे. त्यांना 2022 मध्ये एनआयएमध्ये 5 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. नुकतीच त्यांना अतिरिक्त महासंचालक पदावर बढती देण्यात आली आहे.





























































