
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वेवर दुसरी वातानुकूलित लोकल येत्या जानेवारी महिन्यात येणार आहे. परंतु ही लोकल अर्धे डबे वातानुकूलित आणि अर्धे डबे साधे अशा मिक्स तंत्राऐवजी आधीच्याच लोकलप्रमाणे संपूर्ण 12 डब्यांची असणार असून तिच्यासाठी वेळापत्रकात जागा कशी करायची या विचारात पश्चिम रेल्वे प्रशासन पडले आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या पहिल्या वातानुकूलित लोकलच्या चर्चगेट ते विरारदरम्यान एकूण 12 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. या प्रायोगिक तत्त्वावरील एसी लोकलमध्ये निर्माण झालेल्या अडचणी पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाला कळविल्या होत्या. आता दुसरी वातानुकूलित लोकलही ‘भेल’ कंपनीचीच असणार असून त्यात हे बिघाड दुरुस्त केले असतील अशी आशा असल्याचे प.रे.चे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी आज आरपीएफच्या 34 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.
आरपीएफसाठी सोयीसुविधा
रेल्वे सुरक्षा बलाच्या बलसाड येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध सुधारणा केल्या जात असून त्यांना योग्य निवारा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोस्ट आणि बॅरेकमध्ये विविध सुविधा दिल्या जात आहेत. बॅरेकमध्ये वॉशिंग मशीनपासून टीव्हीपर्यंतच्या सुविधा दिल्या जात असून त्यांच्या दिमतीला महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे 200 जवान उपलब्ध केले असल्याचेही महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
मिक्स लोकल कधी येणार!
पश्चिम रेल्वेवर सध्या सुरू असलेल्या 12 डब्यांच्या एसी लोकलमुळे साध्या लोकलच्या 12 फेऱ्या बाधित होत असल्याने सहा डब्बे वातानुकूलित तर सहा डब्बे साधे अशा मिक्स लोकल चालविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्याची नेमकी अंमलबजावणी केव्हा होईल हे सांगू शकत नसल्याचे यावेळी गुप्ता म्हणाले. जानेवारी महिन्यात येणारी दुसरी एसी लोकल संपूर्ण 12 डब्यांची असेल आणि तिच्यासाठी वेळापत्रकात जागा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
























































