मरीन ड्राइव्ह ते वरळी फक्त 9 मिनिटांत; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत

मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा मंगळवार 11 जूनपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱयानंतर ही मार्गिका सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटांत करता येणार आहे. दरम्यान, ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास खुली ठेवली जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पातील जो हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणे शक्य आहे तो उपलब्ध करून द्यावा, त्यातून वाहतुकीचा भार कमी व्हावा, मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर व्हावा, या हेतूने टप्प्या-टप्प्याने मार्ग खुले करण्यात येत आहेत. याआधी 11 मार्चला वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. यामुळे वाहतुकीचा मुंबईकरांना मोठय़ा प्रमाणात फायदा होत आहे. आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमर सन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होणार आहे. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होणार आहे.

उत्तरेकडील प्रवास अधिक सुलभ

उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता 10 जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहेत.