
सामना प्रतिनिधी, पंढरपूर
श्री विठ्ठलाचे दर्शन घेत असताना गाभाऱयातील सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर भाविकाने केलेल्या तक्रारीनंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ‘त्या’ सुरक्षारक्षकाला निलंबित केले आहे.
श्री विठूरायाच्या दर्शनासाठी नाशिक व मुंबई येथील सोनवणे व येवलेकर हे कुटुंब आले होते. गाभाऱयात दर्शन घेत असताना हा मारहाणीचा प्रसंग घडला. सोनवणे कुटुंबासमवेत त्यांचा एक वर्षाचा मुलगा होता. या मुलाला देवाच्या पायावर घालण्यासाठीच ते पंढरीत आले होते. हा मुलगा शरद सोनवणे यांच्या कडेवर असल्यामुळे त्यांना दर्शन घेण्यास वेळ लागला. यामुळे गाभाऱयात उभ्या असलेल्या खासगी सुरक्षा कर्मचाऱयाने त्यांना जोरात धक्का दिला. यामुळे मुलगा वडिलांच्या कडेवरून खाली पडला.
सुरक्षारक्षकावर निलंबनाची कारवाई
या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी याची गंभीर दखल घेत मारहाण करणारा सुरक्षारक्षक भारत देवमारे यास निलंबित करण्याचा आदेश काढला आहे. या घटनेची चौकशीदेखील केली जाणार असून निलंबन काळात सुरक्षारक्षकास वेतन, भत्तादेखील दिला जाणार नाही.




























































