कोणता मोबाईल घेऊ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमित घोडेकर, [email protected]

मोबाईल. गरज आणि एक प्रतिष्ठेचे गॅजेट सुद्धा. तुमच्या हातात कोणता मोबाईल आहे यावरून बऱयाचदा स्टेट्स ठरते. पण खरंच कोणता मोबाईल घ्यावा…

मित्रा, थोडं थांबला असता तर अजून चांगलं मॉडेल घेतलं असतं. अरे, किती घाई केलीस? या महिन्यात अमक्या अमक्या मोबाईलचं नवीन मॉडेल लाँच होणार होते आणि ते स्वस्त पण होतं. एकदा विचारायचं तर खरं.

बऱयाचदा आपण एका विशिष्ट मोबाईल कंपनीचा मोबाईल वापरत असल्यामुळे नवीन मोबाईल घेतानादेखील त्याच कंपनीचा मोबाईल घेण्याचा पर्याय पहिला ठेवतो आणि कधी कधी ती कंपनी काळानुसार बदलत नसल्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक नवीन गोष्टींचा अंतर्भाव नसतो. त्यामुळे भलेही आपण मोबाईल नवीन घेतला असेल, पण त्यातील वैशिष्टय़े मात्र खूपच जुनी असतात. उदा. नोकिया किंवा ब्लॅकबेरी या मोबाईलमध्ये कालानुरूप बदल न केल्यामुळे या कंपन्याच चक्क बंद पडल्या. एवढा सगळा काथ्याकूट करूनदेखील मूळ प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही आणि ते म्हणजे नवीन चांगला मोबाईल कसा घायचा? या प्रश्नाचे उत्तर खूप सोपं आहे.

  1. बजेट – नवीन मोबाईल घेताना आपल्याला नक्की किती रुपये खर्च करायचे आहेत हे ठरावा. एकदा का हा आकडा ठरला की, नवीन मोबाईल घेण्याचं काम खूप सोपं होऊन जातं.
  2. फिचर्स – अनेक लोक मोबाईलमध्ये ग्राफिक्स गेम्स खेळतात त्यांना वेगळा मोबाईल घ्यावा लागेल. अनेक लोक चित्रपट बघण्यासाठी मोबाईल घेतात. आपल्याला कोणती वैशिष्टय़े दररोज वापरावी लागतात आणि ती कोणत्या मोबाईलमध्ये आहेत तसेच नवीन कोणते फिचर्स भविष्यात आपल्याला उपयोगी पडू शकतात याचा अभ्यास करूनच नवीन मोबाईल घ्या.
  3. बॅटरी – नवीन मोबाईल घेताना चेक करण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी किती वेळ चालते. एकदा चार्ज केल्यावर मोबाईल किती वेळ चालतो हे तपासूनच मोबाईल घ्या.
  4. स्क्रीन साईज – जर आपल्याला मोबाईलमध्ये संगणकाप्रमाणे कामे करायची असतील किंवा चित्रपट बघायचा असेल तर तुम्हाला थोडा मोठा साईजचा मोबाईल घ्यावा लागेल, यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसजशी तुमची स्क्रीन साईज वाढेल तशी तुमची बॅटरी कमी होईल आणि मोबाईलचे वजन वाढेल. त्यामुळे योग्य साईजचा मोबाईल घेणे कधीही चांगले.

कॅमेरा – नवीन मोबाईल घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. आजकाल लोक वेगळा डिजिटल कॅमेरा घेण्याऐवजी मोबाईलमधूनच फोटो काढतात आणि मोबाईलमधील कॅमेरा अतिशय प्रगत झाल्यामुळे मोबाईलचाच कॅमेरा म्हणून वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. जर तुम्हीदेखील फोटोग्राफीचे शौकीन असाल तर चांगला कॅमेरा असणारा मोबाईल घेणे ही तुमची सगळ्यात पहिली प्राथमिकता असायला हवी. आजकाल तीन कॅमेरा असणारे मोबाईलदेखील आले आहेत. तेदेखील तुम्ही विचारात घेऊ शकता. काही लोक सेल्फी, फोटो काढण्यावर जास्त भर देतात. त्यांनी चांगल्या सेल्फी कॅमेरा असणाऱया मोबाईलचा विचार करावा.