महिला बचत गटाने शोधला उत्पन्नाचा मार्ग मास्क विक्रीतून मिळवले 3 लाखांचे उत्पन्न

431

कारभाटले येथील महिला बचत गटाने कोरोनाचे संकट ओळखून व मास्कचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन मास्क तयार करण्याचे ठरवत काम हाती घेतले. कारभाटले येथील श्रीदेवी जुगाई महिला बचत गटाने लॉकडाऊनदरम्यान 16 हजार 820 मास्क तयार करीत मास्क विक्रीतून 3 लाख 2 हजार 760 एवढे उत्पन्न घेतले आहे. शेती करीत असताना उरलेला वेळ व्यवसायाकडे देण्यासाठी कारभाटलेतील महिलांनी श्रीदेवी जुगाई बचत गटाची स्थापना केली. बचत गटांनी सर्व जबाबदारी अर्चना घोरपडे यांच्याकडे दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानांतून मास्कची कमतरता असल्याचे महिला बचत गटाला समजल्यावर त्यांनी मास्क तयार करण्याचे ठरवले व त्यासाठीचे लागणारे प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत गटविकास अधिकारी रेवंडकर, तालुका अभियान व्यवस्थापक हिंदुराव गिरी, अभियान व्यवस्थापक दीपक कदम, युवराज राठोड, प्रभाग समन्वयक प्रदीप पाताडे, योगेश देशमुख, मयुरी गुरव यांचे सहकार्य घेत मास्क बनवण्यास सुरुवात केली. बचत गटांनी व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत कोरोना युद्धातील पोलीस तसेच आरोग्य कर्मचारी यांना बनवलेले मास्क मोफत दिले आहेत.

मेहनतीचे फळ मिळाले

महिला बचत गटाने तयार केलेल्या मास्कला चांगली मागणी वाढल्याने महिलांनी दिवस-रात्र काम सुरू केले. त्यामुळे काही दिवसांत 16 हजारांवर मास्क तयार झाले व त्यांची विक्रीही झाली. या विक्रीतून बचत गटाला 3 लाखांवर उत्पन्न मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या