बीडमध्ये महिला डॉक्टरांना स्वरक्षणाचे धडे; तायक्वांदो असोसिएशनचा उपक्रम

475

सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही. आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण तत्पर असणे गरजेचे आहे. या उद्देशानेच डॉक्टर असोसिएशन आणि तायक्वांदो असोसिएशन यांनी संयुक्तरित्या बीडमधील शंभर महिला डॉक्टरांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले.

बीडमधील आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनिल बारकुल आणि तायक्वांदो असोसिएशनचे प्रशिक्षक अविनाश बारगजे, जया बारगजे यांनी पुढाकार घेत बीडमधील शंभर महिला डॉक्टरांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले. छोट्या-मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी महिलांनी सक्षम असावे, प्रत्येक संकटाचा मुकाबला करण्यासाठी तत्परता आणि डावपेचाचे प्रशिक्षण तायक्वांदो असोसिएशनने दिले. आतापर्यंत या असोसिएशनने पाच हजार महिलांना प्रशिक्षित केले आहे. त्यात शहरी आणि ग्रामिण भागातील बचत गटाच्या महिलांना नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींना जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांना आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रशिक्षित केले आहे. यावेळी अविनाश बारगजे आणि जया बारगजे यांनी सांगितले की, सध्याचे वातावरण असुरक्षित आहे. कोणती घटना कधी घडेल, कोणते संकट कोणावर कधी ओढवेल हे सांगता येत नाही. महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे. छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी सक्षम असणे आवश्यक आहे. महिलांनी आलेल्या संकटाचा मुकाबला धैर्याने करावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, प्रतिकार करण्याचे डावपेच आणि संकटाचा सामना करण्याचे प्रशिक्षण या उद्देशानेच देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या