
सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू बुश सिनीयर यांचे काल येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. या वर्षीच त्यांचा 94 वा वाढदिवस जूनमध्ये साजरा करण्यात आला होता. या वर्षी 17 एप्रिल रोजी त्यांची पत्नी बार्बरा बुश (92) यांचे निधन झाले होते. यानंतर बुश यांची प्रकृती खालावत गेली. त्यातून ते सावरलेही. काल मात्र त्यांची प्राणज्योत अचानक मालवली.
1989 ते 1993 या काळात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तत्पूर्वी 1981 ते 1989 पर्यंत ते उपराष्ट्राध्यक्ष होते. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’चे प्रमुख होते. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघात ते अमेरिकेचे राजदूतही होते. 1992 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. आर्थिक मंदीच्या लाटेचा त्यांना फटका बसला. यामुळे बिल क्लिंटन हे तेव्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले होते.
बुश हे विदेशी राजकारणाचे चांगले जाणकार होते. सोव्हिएत रशियाचे 1989 रोजी विघटन झाले तेव्हा त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पुढे दोन वर्षांनी इराकचे सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी विविध देशांची आघाडी स्थापन केली होती.

























































