ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन

अनेक मराठी नाटकांना तसेच जाहिरातींना आपल्या सुलेखनाने साकार करणारे ज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते.

कमल शेडगे यांचा जन्म 22 जून 1935 रोजी गिरगाव येथे झाला. त्यांचे वडील एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकांची शीर्षके बनवण्याचे काम करत असत. कमल शेडगे यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं आणि ते या सुलेखन क्षेत्रात आले. अनेक वर्षं नियतकालिकांसाठी सुलेखन केल्यानंतर ते नाटकांच्या जाहिरातीतल सुलेखनाकडे वळले.

गेली अनेक वर्ष मराठी नाटकांची, विविध जाहिरातींची शीर्षके त्यांच्या वळणदार लेखणीतुन साकार होत असत. रायगडाला जेव्हा जाग येते, प्रेमा तुझा रंग कसा, गारंबीचा बापू, ती फुलराणी, स्वामी, ऑल द बेस्ट, वस्त्रहरण अशा विविध नाटकांच्या जाहिरातींसाठी त्यांनी सुलेखन केलं होतं. कमल शेडगे यांनी लिहिलेली माझी अक्षरगाथा, चित्राक्षरं आणि कमलाक्षरं ही सुलेखनावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या