परळीत लाल परीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

24

सामना प्रतिनिधी । परळ

शहरातील आगारात आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आजचे औचित्य साधून शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना तिकीटामध्ये आजपासून मिळणार सवलत योजनेचे उदघाटन परळी वैजनाथ पत्रकार संघाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने, जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम, बालकिशन सोनी, अनिरुद्ध जोशी,एस.एम.पाटील,जगदिश शिंदे,आदी पत्रकार उपस्थित होते.

१ जून पासून शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना तिकीटामध्ये आजपासून मिळणार सवलत सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना तिकीट दरात आसनी शिवशाही बसमध्ये ४५ टक्के तर शयनयान शिवशाही बसमध्ये ३० टक्के सवलत मिळणार आहे. सर्वसाधारण बसमध्ये या आधीच ५० टक्के तिकिटाची सवलत मिळत आहे अशी माहिती परळी वैजनाथचे आगार प्रमुख आर. बी. राजपूत यांनी दिली.सुमारे सतरा हजार बसेसचा ताफा, दररोज १७ हजार मार्गांवर ७० लाख प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, २४७ आगारे असा अवाढव्य कारभार राज्यात महामंडळ यशस्वीपणे चालवत आहे.

“प्रवाशांच्या सोईसाठी आणि सुरक्षेसाठी सध्या संपूर्ण बस स्थानक परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणणे सुरु आहे. तसेच बस स्थानकाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे” अशीही माहिती राजपूत यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना दिली. आजच्या वर्धापनादिनानिमित्त प्रवाशांना मिठाई वाटपदेखील केले गेले. यावेळी ए. आर. बिडवे, आर. एस. सोनवणे, सचिन राठोड, बल्लाळ, के. पी. गोदाम, होळंबे, मोरे, दौंड आदी परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

परळी आगराची वैशिष्ट्ये
◆ ७० गाड्या ज्यात ४ शिवशाही बस समाविष्ट आहेत.
◆ दररोज सरासरी १७ हजार प्रवाशांची सुरक्षित वाहतूक.
◆ साधारणपणे दोन कोटींचा मासिक महसूल जमा होतो.
◆ दररोज अंदाजे ९ हजार लिटर डिझेल इतके इंधन लागते.
◆ ४५० कर्मचारी या आगारात कारणीभूत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या