माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षणाच्या उपक्रमांबाबत बैठक बोलावली होती. तेव्हा मी केवळ सहा दिवसांचा होतो. आई मला या बैठकीला घेऊन गेली होती. तेव्हा तिने मला काय शिकवले माहीत नाही. परंतु पुढे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ शुक्रवारी पार पडला. यानिमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली या वेळी ते बोलत होते.