ज्येष्ठ साहित्यिक मधु जामकर यांनी जागवल्या आशा भोसले यांच्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
senior-writer-madhu-jamkar-reminisces-memories-of-legendary-singer-asha-bhosle

बीड – परळीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची संगीत रजनी ठरले होते. आशाताईंचा स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा बाणा या संमेलनातही उपस्थितांना पाहता आला.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १९९८ साली म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या संमेलनातील विविध परिसंवाद, चर्चासत्रे, काव्य संमेलने, या सर्व कार्यक्रमांमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम हा आशाताई भोसले यांचे सादरीकरण आकर्षण ठरले.

या संमेलनाची संकल्पना ‘साहित्य-सूर’ अशी असल्याचे आशाताईंसमोर मांडल्यानंतर तेव्हा त्यांनी परळीस येण्यास तत्काळ होकार दिला आणि त्यांचा सांगीतिक कार्यक्रम न भूतो असा ठरल्याच्या आठवणी या संमेलनाचे कार्यवाहपद भूषवलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांनी आशाताईंच्या निधनानंतर जागवल्या.

मराठी विषयाचे प्राध्यापक राहिलेले मधु जामकर यांनी सांगितले की, १९९८ साली परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील भव्य प्रांगणात मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष विनोदी साहित्याचे प्रख्यात लेखक प्रा. द. मा. मिरासदार होते. उद्घाटक उर्दू साहित्यिक अली सरदार जाफरी होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. तर समारोपाच्या मुख्य पाहुण्या होत्या बंगाली साहित्यातील प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी होत्या. अशा अत्यंत दिग्गज सारस्वतांच्या मांदियाळीने हे संमेलन साहित्य प्रेमींचे आकर्षण ठरले होते.

यातील पहिल्या दिवसाच्या कवी कक्षाच्या संमेलनाचे अध्यक्षपद कविवर्य प्रा. वसंत बापट यांनी भूषविले होते. तर कविता सादर करणाऱ्यांमध्ये नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, शंकर वैद्य, नीरजा, फ. मु. शिंदे, इंद्रजित भालेराव, नारायण कुळकर्णी, महेश केळुसकर, नीलिमा गुंडी आदी दिग्गज कवींनी सादरीकरण केले होते.

समारोप २६ एप्रिल १९९८ रोजी झाला. या दिवशी रात्री आशा भोसले यांचा ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे आशाताईंशी संपर्क करता आला आणि त्यांनी मोठ्या आनंदाने परळीच्या संमेलनाला येण्याचे मान्य केले. वैयक्तिक आपला त्यांच्याशी पंधरा मिनिटे संवाद झाला. त्यात साहित्य हा विषयही होता. आपल्या एकूणच साहित्यासह इतरही साहित्याबाबतची माहिती त्यांनी आपल्याकडून अत्यंत आस्थापूर्वक ऐकली.