रुपया विक्रमी कोसळला, बाजार गडगडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रुपयाची नीचांकी घसरण सुरूच असून मुंबई शेअर बाजारातही सेन्सेक्स 550 अंकांनी कोसळला. बाजार उठल्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 1.79 लाख कोटी रुपये बुडाले. निफ्टीचा अंकही 150 ने कोसळून 10858 वर बंद झाला.

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. मंगळवारी एका डॉलरसाठी 73 रुपये 34 पैसे मोजावे लागले. रुपयाचे हे आजवरचे नीचांकी अवमूल्यन आहे. शेअर बाजारातही रुपयाच्या घसरणीचे पडसाद उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 550 अंकांनी घसरून 35975 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. 1.79 लाख कोटी रुपये बुडाले.

काय आहे कारण

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण हे सेन्सेक्स कोसळण्यामागचे प्रमुख कारण आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत.

यांना मोठा फटका

मंगळवारी सेन्सेक्स कोसळल्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राला मोठा फटका बसला. महिंद्राचे शेअर 6.80 टक्क्यांनी पडले. एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, विप्रो, सनफार्मा, रिलायन्स, एशियन पेंटस्, भारती एअरटेल, मारुती, कोटक बँक, ऑक्सिस बँकेचे शेअर कोसळले.