
मुस्कुराइये, आपण लखनऊमध्ये आहात! आणि त्याच वेळी हिंदुस्थानी संघही 2-1 आघाडीचे स्मितहास्य चेहऱयावर ठेवून मैदानात उतरणार आहे. वन डेपाठोपाठ टी-20 मालिकाही खिशात घालून कसोटी पराभवाच्या जखमेवर मलम लावण्याचा हा प्रयत्न आहे. प्रश्न एवढाच आहे, हे स्मितहास्य मालिका विजयात बदलणार का? सूर्यकुमारच्या संघाकडून सर्वांना हीच अपेक्षा आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची अवस्था प्रयोगशाळा क्रिकेटसारखी झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप अंतिम सामन्यानंतर या संघाने 28 पैकी तब्बल 18 सामने गमावले आहेत. आकडे स्पष्ट बोलतात, ना सातत्य, ना स्थैर्य! योग्य संयोजनाच्या शोधात संघ व्यवस्थापनाने इतके प्रयोग केले आहेत की, खेळाडूंना लय मिळायच्या आधीच पुढचा बदल समोर उभा ठाकतो. परिणामी, लय हरवलेली टीम आणि वाढते पराभव हेच पदरी पडले आहे.
हिंदुस्थानी संघातही सगळे काही आलबेल आहे असे नाही. उपकर्णधार शुभमन गिलचा फॉर्म चर्चेचा विषय ठरतोय, पण त्याच वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवही समीक्षेच्या भोवऱयात सापडला आहे. तिसऱया टी-20 सामन्यात 118 धावांचे अगदी माफक लक्ष्य असताना सूर्यकुमारकडे आपली जुनी लय परत मिळवण्याची सुवर्णसंधी होती, मात्र 12 धावांत बाद होत ती संधी त्याने वाया घातली. कधीकाळी प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारे त्याचे पिक-अप शॉट्स सध्या अनियमित निकाल देत असून हा संघर्ष लपून राहिलेला नाही.
सूर्यकुमार मात्र आपण खराब फॉर्ममध्ये नसल्याचा ठाम दावा करतो. ‘मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय. माझ्या नियंत्रणात जे आहे, ते मी करत आहे. धावा येणारच आहेत,’ असे तो सांगतो. पण आकडे मात्र काही वेगळीच कथा सांगतात. या मोसमात त्याची सरासरी 15 पेक्षा कमी आहे, तर 2025 मध्ये अद्याप एकही अर्धशतक नाही हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वांत लांबचा कोरडा काळ ठरतोय. विश्वचषकाला दोन महिन्यांपेक्षा कमी वेळ उरलेला असताना गतविजेत्या संघाला आपला कर्णधार लवकरात लवकर लयीत परतावा, अशीच अपेक्षा आहे.
उपकर्णधार शुभमन गिलची कहाणीही फारशी वेगळी नाही. सलामीला उतरताना तो अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीयत त्या खात्रीशीर फलंदाजाच्या रूपात दिसलेला नाही, जो तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आहे. संजू सॅमसनसारख्या स्थिर फलंदाजाला मागे सारून मिळालेल्या संधींचे गिलला अद्याप सोने करता आलेले नाही. तिसऱया सामन्यात 28 धावांची खेळीही विश्वचषकापूर्वीची चिंता कमी करणारी ठरलेली नाही.
विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानकडे या प्रारूपात आता फक्त सात सामने उरले आहेत. अक्षर पटेल आजारी असल्याने मालिकेतून बाहेर पडला असून, शाहबाज अहमदला संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराच्या उपलब्धतेबाबतही अजूनही साशंकता आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगने ‘मॅन ऑफ द मॅच’ कामगिरी करत जबाबदारी उचलली, तर हर्षित राणानेही त्याला योग्य साथ दिली.
मालिकेतील चढउतार पाहता लखनऊचा सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात हिंदुस्थानचा दबदबा, दुसऱयात दक्षिण आफ्रिकेची पलटी आणि तिसऱयात पुन्हा हिंदुस्थानची एकतर्फी सरशी. त्यामुळे मालिका जिवंत आहे. दक्षिण आफ्रिकेला ती जिवंत ठेवायची असेल तर आज हर हालत में जिंकावेच लागेल. तर हिंदुस्थानसाठी हा सामना म्हणजे मालिका विजयाच्या दिशेने टाकलेले जोरदार पाऊल ठरू शकते.
संभाव्य संघ
हिंदुस्थान ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, एन. टी. तिलक वर्मा, शाहबाज अहमद, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, संजू सॅमसन, हर्षित राणा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका ः एडेन मारक्रम (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रिझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, मार्को यान्सन, लूथो सिपाम्ला, ओटनील बार्टमन, एनरिक नॉर्किया, लुंगी एनगिडी, कोर्बिन बॉश, केशव महाराज, जॉर्ज लिंडे.

























































