
विधान परिषदेच्या मिंधे गटाच्या आमदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी दोषमुक्त करण्यात यावे यासाठी खान याने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र अर्जदार आरोपी हा पडद्यामागील व्यक्ती असून त्याच्या विरोधात तपास यंत्रणांकडे भक्कम पुरावे असल्याचे स्पष्ट करत अतिरिक्त न्यायाधीश एस.सी. डागा यांनी त्याचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या दणक्यामुळे खान याच्या अडचणी वाढल्या आहेत.
‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ नावाच्या संस्थेतील निधीमधील पैसे लाटल्याचा आरोप खान याच्यावर असून सप्टेंबर 2021 साली ईडीने खान याला अटक केली होती. खान आणि गवळी यांनी सुमारे 18 कोटी रुपयांची बनावट कागदपत्रे आणि फसवणूक करून संस्थेचे खासगी कंपनीत रुपांतर केल्याचा ईडीने ठपका ठेवला आहे. खान जामिनावर असून या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आपण निर्दोष असून कधीही संस्थेचे पदाधिकारी नव्हतो, संस्थेचे कंपनीत रुपांतर झाल्यानंतरच आपण अध्यक्ष पद स्वीकारल्याचा युक्तिवाद त्याने कोर्टात केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा हा दावा फेटाळून लावला.
न्यायालयाचे निरीक्षण काय…
खान याने पडद्यामागून भूमिका बजावली असून तपास यंत्रणेकडे त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. आरोपी हा संस्थेचा पदाधिकारी नव्हता, परंतु पदाधिकारी नसलेली व्यक्तीसुद्धा संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकते. पडद्यामागील सूत्रधारांना समोर आणणे गरजेचे असून या प्रकरणात आरोपी पडद्यामागून काम करत असल्याचे पुराव्यांतून निष्पन्न झाले आहे.




























































