महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला जागतिक प्रेरणा केंद्र करू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिथे स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुंकले, चळवळीची बीजे रुजली तो सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज आहे. शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱया महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखडय़ातील विकासकामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. गांधीजींच्या स्मृती जपणाऱया सेवाग्राममधील कर्मचाऱयांचे अभिनंदन करुन ते म्हणाले, सेवाभावी कार्यकर्त्यांनी वास्तूसोबतच गांधीजींची मूल्येही जपली. मूल्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवाग्रामच्या कार्यकर्त्यांनी मूल्य जपणुकीचे केलेले काम आपल्याला करायचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची नितांत सुंदर स्कल्पचर उभे करणाऱया जे. जे. स्कुलचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

स्वातंत्र्य व विकास खेडय़ांपर्यंत पोहोचायला हवा!
महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेडय़ाकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेडय़ातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेडय़ांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्वाचे आहे. स्वातंत्र्य आणि विकास खेडय़ापर्यंत नेणे म्हणजे सर्वांनी खेडय़ाकडे जाणे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे – अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱहास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतानाच येथील बेरोजगारांनी स्वयंरोजगाराची कास धरावी, यासाठी एम. गिरी या संस्थेत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे पाठविला असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.