बिहारमध्ये बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याने सात मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी तीन मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एफएसएल पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
भागलपूरमधील खिलाफत नगरमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली. सात लहान मुलं परिसरात खेळत असताना अचानक स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बसदृश्य वस्तू दिसताच मुलांनी कुतूहलाने काय आहे पाहण्यासाठी हाताळली असता त्याचा स्फोट झाला. यात 3-4 मुलं किरकोळ जखमी झाली तर तीन मुलं गंभीर जखमी झाली.
तिघांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टसह डॉग स्कॉडही घटनास्थळी दाखल झाले आहे. तपासानंतरच सदर वस्तू देशी बॉम्ब होता की फटाका हे उघड होईल, अशी माहिती भागलपूरचे एसएसपी आनंद कुमार यांनी दिली.