भंडाऱ्यात ईव्हीएमवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव झाकले, सात कर्मचारी निलंबित

भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार करुणा राऊत यांचे ईव्हीएम बॅलेट युनिटवरील नावच मतदानाच्या वेळी गायब झाल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकाऱयांनी संबंधित मतदान केंद्रावरील सात कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी असणाऱया भंडारा प्रांत अधिकारी माधुरी तिखे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भंडारा नगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादीच्या करुणा राऊत यांच्यासह पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक 3 मधील दोन उमेदवारांची तसेच ‘नोटा’ची मतेच दिसत नसल्याने संबंधित उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला.

 ईव्हीएम मशीन वापरण्यात आले त्याचे बॅलेट युनिट आणून त्याची तपासणी केली असता फक्त चारच उमेदवारांची नावे होती. पाचव्या क्रमांकावर असणारे करुणा राऊत आणि सहाव्या क्रमांकावरील ‘नोटा’ पर्याय झाकून ठेवण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकाऱयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.