गोवामार्गे हाँगकाँगला जाण्याआधीच साडेसात कोटींचे रक्तचंदन मुंबईत जप्त

577

दक्षिण हिंदुस्थानातून दोन टेम्पो भरून साडेसात कोटी किमतीचा दुर्मिळ रक्तचंदनाचा साठा एक टोळी मुंबईत घेऊन आली. मुंबईतून पाठवणे शक्य नसल्याने हा रक्तचंदन ते गोव्यातून हाँगकाँगला पाठविण्याच्या तयारीत होते. सर्वकाही ठरले होते. ते दोन टेम्पो सांताप्रुझमधून निघणार तेवढय़ात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने चंदनतस्करांना दणका दिला. तिघांना रंगेहाथ पकडून तब्बल साडेसात कोटी किंमतीचे 1 हजार 556 किलो रक्तचंदन जप्त केले.

असगर शेख (49), अली शेख (32) आणि वाजिद अन्सारी (32) अशी चंदनतस्करांची नावे आहेत. एक टोळी दक्षिण हिंदुस्थानातून दुर्मिळ रक्तचंदनाचा साठा दोन टेम्पो भरून मुंबईत घेऊन आले आहेत. हा साठा ते परदेशात पाठविण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजीव गावडे, आशा कोरके, एपीआय सुधीर जाधव, शरद धराडे, उपनिरीक्षक वाल्मीक कोरे, विजेयंद्र अंबवडे तसेच सावंत, पेडणेकर, महांगडे, गवडे, झोडगे आदींच्या पथकाने सांताप्रुझ येथे सापळा रचून ते दोन टेम्पो पकडले. टेम्पोमध्ये रक्तचंदनाचा साठा सापडला. हा साठा पकडून  सात कोटींचे चंदन जप्त केले. आरोपी हे आंतरराष्ट्रीय तस्करी करणार्‍या टोळीतले असून त्यांनी नेमके कुठून हे रक्तचंदन आणले आणि हाँगकाँगला कोणाला विकणार होते याचा युनिट-9 तपास करीत आहेत.

चंदन तस्करांचा डाव फसला

मुंबईतून चंदनाचा साठा परदेशात पाठविणे शक्य नसल्याने आरोपींनी गोव्याची निवड केली. गोव्यामार्गे हाँगकाँगला हा साठा पाठवायचे असे ठरले. त्यानुसार त्यांनी प्लॅनिंगदेखील केली. पण युनिट-9च्या पथकाने मुंबईतच चंदन तस्करांचा डाव उद्ध्वस्त केला.

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफने परदेशी प्रवाशांकडून 17 किलो चंदन जप्त केले. अलझेन मुस्तफा सलीम असे त्याचे नाव आहे. अलझेन हा मूळचा सुदान देशाचा नागरिक असून तो अदिस अबादा येथे चंदनाचा साठा घेऊन जाणार होता, पण मुंबई विमानतळावरतीच तो लटकला. त्याने चंदन कोणाकडून घेतले याचा तपास वन विभाग करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या