अलिबागच्या 70 गावपाड्यांत भीषण पाणीटंचाई; उमटे धरणाच्या सफाईचे टेंडर गाळात रुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेचे उमटे धरण पुरते गाळात रुतले. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी घट झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या ७० गावपाड्यांना पाणीटंचाईचे भीषण चटके बसू लागले आहेत. या धरणाची संरक्षक भिंत दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार वेळा ई-टेंडर काढले. मात्र योग्य ठेकेदार मिळत नसल्याने या धरणाची पाणी योजना गाळात पुरती बुडाली आहे.

उमटे धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी ८ कोटी ८१ लाख ३५ हजार ६३१ रुपये निधी मंजूर आहे. धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापर्यंत चार वेळा ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. ३१ जानेवारी २०२५ रोजी पहिली तर २४ फेब्रुवारी २०२५ दुसरी, १७ मार्च २०२५ रोजी तिसरी, १५ एप्रिल २०२५ चौथी ई-निविदा प्रकाशित केली.

पहिल्या तीन ई-निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी सहभाग नोंदविला नाही तर चौथ्यांदा राबविलेल्या प्रक्रियेत दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला. मात्र त्यांच्याकडे अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे त्यांना दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे कंत्राट देता आले नाही. यामुळे उमटे धरणाच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती आणि साचलेला गाळ काढण्याचा प्रश्न कंत्राटदार मिळत नसल्याने अंधातरीच राहिला आहे.

उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठीची सरकारची भूमिका फसवी आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात धरण असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव गाळ काढण्याची निविदा काढते? धरणाचा गाळ काढण्यासाठी एकही लायक ठेकेदार मिळत नसेल तर शासनाने निविदेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करून गाळ काढावा. ऐतिहासिक चवदार तळ्याच्या संघर्षाने शंभरी गाठली असतानाही जर पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर सरकारच अपयशी म्हणावे लागेल.
-अॅड. राकेश पाटील (उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड)

गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
पंचेचाळीस वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा घटला असल्याने धरणातून पुरविण्यात येणारे पाणी हे गढूळ असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करूनही तो सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजारचा धोका निर्माण झाला आहे.

… तर अटी-शर्ती बदला
धरणाचा गाळ काढण्यासाठी ठेकेदार मिळत नसेल तर शासनाने निविदेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करून गाळ काढावा अशी मागणी करणारे निवेदन उमटे धरण संघर्ष समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली केली. १९९५ धरण रायगड परिषदेला हस्तांतरित झाले.
धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे.
धरणाच्या पाण्यावर ४७ गावे व ३३ आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील ७७ गावे, वाड्यांमधील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.