
गैरसमजुतीतून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केल्यानंतर एका व्यक्तीला कोलकाता न्यायालयाने दोषमुक्त केले. या व्यक्तीला विनाकारण तब्बल 51 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.
24 नोव्हेंबर 2020 रोजी एका व्यक्तीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2017 पासून संबंधित व्यक्तीसोबत महिलेचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष देऊन या व्यक्तीने साल्ट लेक हॉटेलमध्ये रात्र घालवली होती. या वेळी त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. मात्र दुसऱया दिवशी त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि पळ काढला. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आणि 25 नोव्हेंबर 2020 मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर 14 जानेवारी 2021 पर्यंत न्यायालयाकडून जामीन मिळेपर्यंत तो तुरुंगात होता.
महिलेने काय बाजू मांडली
आरोपीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार महिलेने दावा केला की, संबंधित व्यक्तीसोबत काही गैरसमज झाले होते. त्यातूनच तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे ही तक्रार तिच्या मित्राने दिली होती. त्या तक्रारीत काय लिहिले आहे हे जाणून न घेताच त्यावर सह्या केल्या होत्या, असा दावा महिलेने केला आहे.
न्यायालय काय म्हणाले?
आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हाच एकमेव आरोप करण्यात आल्याचे तक्रारदाराच्या साक्षीवरून दिसत आहे. कुठलाही अन्य साक्षीदार, महिलेची आई, आजी किंवा शेजारी राहाणाऱयांकडून देण्यात आलेल्या साक्षीवरून आरोपीवरील आरोप सिद्ध होत नाहीत, असे न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात नमूद केले. दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे दिसते. त्यामुळे तक्रार न्यायालयासमोर सिद्ध झाली नाही. तक्रारदार महिलेने दिलेल्या साक्षीनुसार आरोपीविरोधात कलम 376 आणि 417 अंतर्गत कुठलाही आरोप करण्यात आलेला नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.