बुलढाण्यात बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. वर्दळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 ते 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. खुशालराव उगले असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दळी गावातील काही पालकांनी आज किनगावराजा पोलीस ठाणे गाठत नराधम शिक्षकाच्या गैरकृत्याची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खुशालराव उगले हा चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याचा तक्रार पालकांनी दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरुन डीवायएसपी मनिषा कदम यांनी पीडित विद्यार्थिनीचे जबाब नोंदवले. त्यानुसार शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2), 65 (2), 75 (1), पोक्सो 4, 6, 8, 10, 12 आणि अट्रॅसिटीच्या कलम 3, 1 W (1,2), 3, 2 ब, 3, 1 RSW अन्वये गुन्हा दाखल केला.
यानंतर डीवायएसपी मनिषा कदम यांनी पोलीस ताफ्यासह वर्दळी गाठून शाळेला भेट दिली. शिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.