
अर्शद वारसीने नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये सर्किटची भूमिका साकारून अर्शदला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मुन्नाभाई आणि सर्किट ही जोडी म्हणूनच अजरामर झालेली आहे. रसिकप्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या जोडीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटानंतर अर्शदचा मुन्नाभाई चले अमेरिका, देखील प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले होते, परंतु नंतर ते पुढे ढकलण्यात आले. अर्शदने चित्रपट रद्द करण्यामागील कारण स्पष्ट केले आणि याकरता त्याने इतर अनेक चित्रपटही सोडले होते असे सांगितले.
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत, अर्शद वारसी यांनी निर्मात्यांनी अखेर चित्रपट का थांबवायचा निर्णय घेतला हे स्पष्ट केले. अर्शद म्हणाला, “माझ्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ची कथा ‘मुन्ना भाई चले अमेरिका’ सारखीच होती. ‘मुन्ना भाई चले अमेरिका’ मध्ये, मुन्ना भाई आणि मी दोघेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतो.”
अर्शद पुढे म्हणाला, “दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे खूप जागरूक आहेत. त्यांचे काम इतर चित्रपटांशी जुळते तेव्हा त्यांना ते आवडत नाही. इतके की ओह माय गॉडबद्दल जाणून घेतल्यानंतर, त्यांनी पीकेचा दुसरा भाग अनेक वेळा पुन्हा लिहिला होता.”
या मुलाखतीमध्ये अर्शदने त्याच्या एकूण चित्रपटांची कारकिर्द यावर खूप साऱ्या गप्पा मारल्या. मुन्नाभाई आणि सर्किटच्या जोडीबद्दल देखील त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले.

























































