
विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी काढताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडलेला आठवीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील माळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिंदे पाड्यात घडली आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. पाणी जमा करण्यासाठी कुटुंबातील सर्वांना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाकडून पुरेसे पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
माळ ग्रामपंचायत हद्दीतील सात पाड्यांवर सध्या पाणीबाणी सुरू झाली आहे. शिंद पाडा येथे राहणारा कृष्णा शिंदे (१४) हा आठवीचा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर पाण्याच्या शोधात भटकत होता. या परिसरातील एका विहिरीचे पाणी थेट तळाशी गेलेले आहे. ते पाणी तो काढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि विहिरीत पडला. विहिरीतील दगडांचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यालाही मोठी दुखापत झाली आहे. याच विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या अन्य ग्रामस्थांनी त्याला तातडीने दोराच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढले आणि एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
■ पाण्याचे स्रोत आटल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून पाणी जमा करावे लागत आहे. मात्र शासनाकडून या पाणीटंचाईवर कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
■ गेल्या काही वर्षांपूर्वी अशीच एक विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर विहिरीवर आईसोबत पाणी आणण्यासाठी गेली होती. विहिरीतून पाणी काढत असताना ती तोल जाऊन विहिरीत पडली होती. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता.
■ सध्या या पाड्यावर रोज एक टँकर पाणीपुरवठा सुरू आहे. येथील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन वरिष्ठांकडे आणखी एका अतिरिक्त टँकरची मागणी करण्यात येणार आहे, पाणीपुरवठा विभागाचे लिपिक किशोर गायकवाड यांनी सांगितले.
दोन टँकर पाणी द्या !
माळ ग्रामपंचायतीतील सर्वच सात पाड्यांत सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. रोज येणाऱ्या टँकरचे पाणी गावात येईपर्यंत अर्धे होत असल्याने पाणीपुरवठा पुरेसा होत नाही. दोन पाड्यांत दोन विहिरी असल्याने रोज किमान दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माळ ग्रामपंचायतीचे सरपंच सोनू बंगारा यांनी केली आहे.