
मुंबईकरांची तहान भागवणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. मात्र सरकारी अनास्थेमुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या तालुक्याची झाली असून यंदा डिसेंबर महिन्यातच शहापूरकरांचा घसा कोरडा पडला आहे. अनेक वाड्यापाड्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. हातपंपांना टिपूस नाही अशी भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही आदिवासींना हंडे, कळशा घेऊन पाण्यासाठी दोन-दोन किमीची पायपीट करावी लागत आहे.
शहापूर तालुक्यात साधारणतः फेब्रुवारीमध्ये पाणीटंचाई जाणवू लागते. मात्र यंदा पावसाने तब्बल पाच महिने मुक्काम ठोकूनही डिसेंबरच्या सुरुवातीलाच कसारा भागातील पारधवाडी, नारळवाडी व पायरवाडी या तीन वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट कोसळले आहे. या तीनही पाड्यांवरील विहिरींमध्ये पाण्याचा ठणठणाट झाला असून हातपंप व अन्य पाण्याचे स्रोत आटल्याने तेथील माताभगिनींना डोक्यावर चार-चार हंडे घेऊन तब्बल दोन किमी लांब असलेल्या कळमांजरा दरीतून पाणी आणावे लागत आहे. गावातील दमछाक करणाऱ्या समस्यांमध्ये पाण्याची भर पडली आहे.
भावली योजनेत अडथळे
विविध पाणीयोजनांवर, त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून त्यावरदेखील कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम सुटावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी योजना राबवण्यात येत आहे. मात्र झारीतील शुक्राचार्यांमुळे या योजनेमध्ये अडथळे येत असल्याने भावली योजनेत आतापर्यंत खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात जातात की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईमुळे तेथील ग्रामस्थ माताभगिनींच्या रोजगारावर गदा आली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी मुलांना सोबत घेऊन जावे लागत असल्याने शाळेला दांडी होते आणि रोजगारही बुडतो.
शाळा आणि रोजगारासाठी जावे तर तहानेने जीव व्याकुळ होतो अशी बिकट अवस्था टंचाईग्रस्त वाड्यांची झाली आहे. पाणीटंचाईचा तालुका अशी ओळख झालेल्या शहापूर तालुक्यात आता टप्प्याटप्प्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढणार असून माताभगिनींची पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण सुरू होणार आहे.






























































