।। श्री शंकरगाथा ।। 62 -दिव्यत्वाची जेथ प्रचीती

>> चैतन्यस्वरुप

श्रीशंकर महाराजांचे अनन्य भक्त कै. गणेश महादेव अभ्यंकर हे लष्करामध्ये कार्यरत होते. तत्कालीन युद्धप्रसंगी शत्रूंनी त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्यांच्या पँटची अक्षरशः चाळण झाली. सुदैवाने पायाला एकही गोळी लागली नाही. हे पाहून अभ्यंकर स्वतः अचंबित झाले. पुढे युद्धाहून परतल्यावर श्रीमहाराजांची दर्शनभेट घेण्यासाठी ते गेले असता श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘‘अरे, तुझ्यावर बरसलेल्या गोळ्या मी झेलल्या म्हणून तुला इजा झाली नाही.’’ आणि त्यांनी आपले पाय दाखविले तेव्हा तिथे अभ्यंकरांना गोळ्यांचे व्रण दिसून आले.
आपल्या संग्रही श्रीमहाराजांची स्वाक्षरी असावी अशी अभ्यंकरांची इच्छा त्यांनी श्रीमहाराजांकडे अनेकदा प्रकट केली. मात्र त्यांनी ती कधीही मान्य केली नाही. पुढे केव्हातरी अभ्यंकर यांनी श्रीमहाराजांसोबत, ‘‘मी तुमची स्वाक्षरी घेणारच!’’ अशी पैजही लावली. पुढे काही कारणाने अभ्यंकरांना श्रीमहाराजांकरिता मनीऑर्डरने पैसे पाठविण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी पाठविलेल्या मनीऑर्डरची पोचपावती त्यांना श्रीमहाराजांकडून मिळाली. त्यांनी कुतूहलापोटी पावती पाहिली असता त्यांना पावतीवर श्रीमहाराजांनी ‘शंकर दत्तात्रेय उपासनी’ या नावाने केलेली सही दिसली. अभ्यंकरांनी आनंदाने ती पावती तिजोरीत जपून ठेवली. काही काळानंतर श्रीमहाराजांची भेट झाली तेव्हा त्यांना अभ्यंकर यांनी ‘‘महाराज, मी पैज जिंकली. तुमची सही मला मिळाली.’’ असे सांगितले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘हे शक्य नाही. मला पावती दाखव.’ अभ्यंकरांनी तिजोरीतून पावती काढून श्रीमहाराजांना दाखवली तेव्हा पावतीवरील सही अंतर्धान पावलेली होती.

ब्रिटिश आर्मीत मोठय़ा पदावर असलेल्या कै. गणेश महादेव अभ्यंकर यांना श्रीमहाराजांचा सहवास आयुष्याच्या उत्तरार्धात लाभला. अभ्यंकर दत्तभक्त असल्याकारणाने अनेकदा गाणगापुरास जात असत. एकदा श्रीगुरुचरित्र पारायणाची समाप्ती झाल्यानंतर ते गाणगापूर येथे माधुकरी मागत असताना अचानक एका साधुपुरुषाने त्यांच्या झोळीत श्रीअक्कलकोटस्वामींचे चित्र टाकले अन् सांगितले की, ‘‘तुला मुलगा होईल. त्याचे नाव ‘दत्तात्रेय’ ठेव.’’ त्या साधुपुरुषाच्या आशीर्वादानुसार त्यांना झालेल्या अपत्याचे नाव त्यांनी ‘दत्तात्रय’ असे ठेवले.

हेच दत्तात्रय पुढे अण्णा व पंत या टोपणनावाने श्रीमहाराजांच्या भक्तपरिवारामध्ये सुपरिचित झाले. त्यांना बालपणापासून श्रीमहाराजांचा सहवास लाभला. एकदा बोलण्याच्या ओघात श्रीमहाराजांनी त्यांचे वडील कै. गणेश अभ्यंकर यांना ‘‘गाणगापूरच्या दत्ताची तू सेवा केलीस म्हणून मी तुझ्या घरी आलो.’’ अशी ओळख दिली होती. श्रीमहाराज अनेकदा अभ्यंकरांच्या नगर येथील घरात वास्तव्य करीत असत.

बालपणी दत्तात्रय अर्थात अण्णा भित्र्या स्वभावाचे होते. त्यांना अंधाराची भीती वाटत असे. श्रीमहाराज त्यांच्या घरी मुक्कामास आले असता त्यांनी अण्णांना मुद्दामहून अपेयपानाची तजवीज करायला सांगितले. त्यावेळी रात्रीचे 11 वाजून गेले होते. अण्णा जाण्यास नकार देऊ लागले तेव्हा श्रीमहाराज रागाने म्हणाले, ‘‘आत्ताच्या आत्ता जा. दुकान मालक तुझी वाट पाहत थांबलाय. तो तुला दोन बाटल्या देईल. त्या घेऊन ये, जा.’’ अण्णांच्या पोटात भीतीने गोळा आला. अखेर नाइलाजाने ते निघाले आणि काळ्याकुट्ट अंधारात श्रीरामनामाचा जप करत नगरच्या किल्ल्याकडे रवाना झाले. कसेबसे ते इच्छित स्थळी पोहोचले तेव्हा श्रीमहाराजांनी सांगितल्यानुसार एक पारशी हातात बाटल्या घेऊन त्यांचीच वाट पाहत उभा होता. त्यांना पाहून तो म्हणाला, ‘‘जा. जल्दी से ये बोतल बाबा को पहुंचा दे। कितना टाईम लगाया। बाबाने संदेश भेजा था, फोन पर।’’ खरे पाहता तेव्हा अभ्यंकरांच्या घरी फोन नव्हता. मग तो संदेश कुणी पाठवला याचा विचार करीत अण्णा अभ्यंकर घरी आले. त्यांना पाहताच श्रीमहाराज खदाखदा हसत म्हणाले, ‘‘काय रे कुणी अडविले नाही ना? आण त्या बाटल्या इकडे.’’
श्रीमहाराजांनी समोरच्या भिंतीवर बाटल्या आपटून खाडकन फोडल्या आणि अण्णा अभ्यंकरांना म्हणाले, ‘‘जा. तुझी भीती मेली, फोडून टाकली.’’ आणि खरोखरीच त्या क्षणापासून अभ्यंकरांची अंधाराविषयीची भीती कायमची निघून गेली.

आपली प्रतिक्रिया द्या