
गोवा ते नागपूर या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी भू-संपादनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकास फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील शेतकऱयांनी विरोध करत पथकाला परत जाण्यास भाग पाडले. यामुळे पंढरपूर तालुक्यातही शक्तिपीठ महामार्गास शेतकऱयांचा तीव्र विरोध होत असल्याचे समोर आले आहे.
गोवा ते नागपूर हा प्रस्तावित महामार्ग पंढरपूर तालुक्यातील 11 गावांच्या हद्दीतून जात आहे. या महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपीक जमिनीचे भू-संपादन होणार असून, त्यांचे मूल्यांकन आणि नुकसानभरपाई अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱयांतून या महामार्गास तीव्र विरोध होऊ लागला आहे. यापूर्वी गावोगावी विरोधाच्या बैठक झालेल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱयांनी हरकती घेऊन विरोध नोंदवला आहे.
फुलचिंचोली येथे बुधवारी (दि. 2) भू-संपादनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी विभागाचे पथक येणार असल्याचे शेतकऱयांना समजले. त्यामुळे सर्व शेतकरी एकत्र जमले आणि त्यांनी या पथकास सर्वेक्षण करण्यास मनाई करत शक्तिपीठ महामार्गाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर या कर्मचाऱयांना सर्वेक्षण न करताच परत जावे लागले.
यावेळी बालाजी वाघ, सौदागर गायकवाड, सतीश दीक्षित, बाळासाहेब टोणपे, जोतिराम जाधव, भास्कर खरात, दीपक भोसले, दाजी गायकवाड, गोरख गायकवाड, सुधीर दीक्षित, मंगल दीक्षित, नीलावती डोंगरे, यमुना काळे आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.