
देशभर गाजलेल्या तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट अॅपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन, पूजाअभिषेक व तेल चढावा यातून शनीभक्तांची फसवणूक व अपहार प्रकरणाच्या तपासात एकूण 77 लाखांचा गैरव्यवहार उघड झाला. या प्रकरणात दोन कर्मचाऱयांना अटक केली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. शनैश्वर देवस्थानने केलेल्या करारात अनियमितता, बनवाबनवी उघड झाली. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी, तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी, अॅपमालक यांच्यासह नऊ संशयित आरोपींविरोधात दोषारोपपत्र नेवासा न्यायालयात दाखलकरण्यात आले.
बनावट अॅप घोटाळाप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात 12 जुलै रोजी सायबर पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली होती. बनावट घोटाळय़ासंदर्भात शनिशिंगणापुरात 18 जणांची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. मंदिरातील पुजारीही यात असल्याचा संशय होता. आता पोलिसांच्या तपासात 77 लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. या घोटाळा प्रकरणात संजय पवार (रा. सोनई) व सचिन शेटे (रा. शनिशिंगणापूर) या देवस्थानच्या दोन कर्मचाऱयांना 4 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. ‘पूजा परिसेवा घर मंदिर’, ‘हरिओम’, ‘ऑनलाइन प्रसाद’, ‘ई-पूजा’ या ऍपधारकांनी शनिशिंगणापूर देवस्थान व धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर यांची परवानगी घेतली नव्हती. यूआरएल संकेतस्थळावर शनि महाराजांच्या शिळेचा फोटो व महाद्वाराचा फोटो वापरला. या बनावट अॅपचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजला. या बनावट ऍप घोटाळ्याच्या चौकशाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सायबर पोलिसांनी मंदिर परिसरातील कर्मचारी व अन्य व्यक्तींची चौकशी सुरू केली होती. सात ते आठ महिन्यांत सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून तपास पूर्ण केला. तपास सुरू होत असतानाच देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. सायबर पोलिसांनी विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच ऍपमालक यांचे जबाब नोंदवले. त्यांना या गुह्यात आरोपी करण्यात आले आहे. शिवाय विविध बँक खात्यांची तपासणी करून कागदपत्रे गोळा करण्यात आली. देवस्थानचे कर्मचारी सचिन शेटे व संजय पवार यांना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
संशयित आरोपी
या प्रकरणातील अटक असलेले संजय पवार (रा. सोनई), सचिन शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन शेटे उपकार्यकारी अधिकारी (मृत), उज्वल निरंजन भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरुण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंपरी, श्रीगोंदा), प्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भरत जयस्वाल (रा. मुंबई), सचिन बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्षनाथ केरू दरंदले (माजी कार्यकारी अधिकारी शनिशिंगणापूर) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
बनावट अॅप घोटाळा प्रकरणात तब्बल 2500 पाणी दोषारोपपत्र 30 जानेवारी रोजी नेवासा न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक केलल्या दोन आरोपींसह 9 संशयित आरोपींचा सामावेश करण्यात आला आहे.
– सागर ढिकले, सायबर पोलीस निरीक्षक, अहिल्यानगर




























































