श्री शंकरगाथा: श्री स्वामी माऊली

287

देशविदेशांमध्ये भ्रमण करून ‘संचारेश्वर’ हे ब्रीदवाक्य सार्थकी लावत श्रीशंकर महाराज महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. संतसत्पुरुषांचे नित्य वास्तव्य लाभलेल्या या भूमीमध्ये श्रीमहाराजांचे अवतारकार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येणार होते. एका सुमुहूर्तावर श्रीशंकर महाराज, ‘प्रज्ञापूर’ अर्थात अक्कलकोट नगरीची थोरली वेस ओलांडून श्रीस्वामीसमर्थ महाराजांची ‘दर्शन’भेट घेण्याकरिता बुधवार पेठेत आले. श्रीस्वामीसमर्थांच्या ‘समाधी’मठामध्ये येताच श्रीमहाराजांना, श्रीस्वामीरायांची ‘स्मरणमात्रे’ सगुण भेट घडली आणि ते सद्गदित झाले. श्रीस्वामीमाऊलीचे वात्सल्यसौख्य प्राप्त होताच श्रीमहाराजांच्या मनातील अष्टभाव दाटून आले आणि अश्रूरूपाने घळघळा ओघळू लागले.

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराज आणि श्रीशंकर महाराज यांच्यामध्ये अंतरीचा अनोखा असा ‘भावबंध’ होता. या दोघांमध्ये माय-लेकराचे आणि गुरू-शिष्याचे ‘नाते’देखील होते. श्रीस्वामीमहाराज व आपल्यातील मायलेकराच्या अलौकिक नात्याचे बंध उघड करताना श्रीमहाराज आठवणींच्या माध्यमांतून सांगत की, ‘स्वामी माझी माऊलीसमान काळजी घेत असत, माझे लाड करीत असत. अनेकदा मला तहान लागली असता स्वामींनी मला उचलून घ्यावे आणि दुग्धपान करवावे. त्यांनीच मला येथवर आणले. स्वामी ही माझी कृपाळू व दयाळू माऊली आहे. जो कुणी माझ्या स्वामीमाऊलीस शरण जाईल त्याच्यावर माझा नित्य ‘लोभ’ राहील.’

श्रीमहाराजांची श्रीस्वामीसमर्थांसोबत ‘सगुण’ भेट घडत असे तेव्हा श्रीस्वामी महाराज, शंकरबाबांच्या जिभेवर छोटेसे शिवलिंग ठेवून त्यावर अभिषेक करीत असत, आणि त्यांचा अभिषेक पूर्ण होईतोपर्यंत श्रीमहाराज ध्यानस्थ बसत असत असा उल्लेख ‘श्रीशंकरगीता’ या ग्रंथाच्या नवव्या अध्यायामध्ये आला आहे. एवढेच नाही तर श्रीमहाराज या प्रसंगाची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या प्रिय भक्तांना आपली जीभ दाखवीत असत, तेव्हा भक्तांना श्रीमहाराजांच्या जिभेवर फुगवटा असल्याचे आढळून येत असे. हा फुगवटा पाहून वाही भक्तांना तेथे शिवलिंग असल्याचेही जाणवले. श्रीमहाराजांच्या जिभेवरील शिवलिंगरूपी फुगवटय़ामुळेच त्यांना बोलताना कष्ट पडत असावे किंवा जिभेचे चलनवलन नीट प्रकारे न झाल्यामुळे श्रीमहाराजांचे बोलणे त्यांच्या समवेत असलेल्या मंडळींना बोबडय़ा पद्धतीचे वाटत असावे.

श्रीस्वामीसमर्थांचा विषय निघाला की, श्रीमहाराजांना विलक्षण आनंद होत असे आणि पुढे बऱ्याचदा श्रीस्वामीरायांचे गुणगान करण्यात ते रंगून जात असत. सोलापूर मुक्कामी असताना श्रीमहाराज, तेथील जनुबुवा, दादा फुलारी, भावेवकील, भस्मेकाका आदी भक्तांसमवेत पौर्णिमेचे औचित्य साधून श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनार्थ अक्कलकोट येथे जात असत. एकदा भावावस्थेत आकंठ बुडालेल्या श्रीमहाराजांनी वटवृक्षानजीकच्या गाभाऱ्याजवळील श्रीस्वामीमहाराजांच्या शेजगृहातील ‘उशी’ आठवणरूपाने आपल्यासोबत नेली. ही माऊलींच्या ‘निजप्रेमाची खूण’ आपल्याला आजदेखील दक्षिण कसबा, सोलापूरच्या दत्तचौकात असलेल्या श्रीशुभराय मठाच्या गाभाऱ्यामध्ये पाहावयास मिळते. श्रीमहाराज त्यांच्या भक्तांना वेळोवेळी नामजप करावयास सांगत असत आणि ’नाम’महिमा कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना ‘माझे गुरू अक्कलकोटस्वामी विख्यात आहेत. त्यांचे प्रतिदिन स्मरण करावे म्हणजे मी तृप्त व प्रसन्न होईन’ असे आवर्जून सांगत असत. याच कारणाने आजदेखील

धनकवडी येथे श्रीमहाराजांच्या समाधी मठात नित्यनेमाने सर्वप्रथम श्रीस्वामीसमर्थ महाराजांचा नामगजर होतो.
अक्कलकोट येथे श्रीशंकर महाराजांना, श्रीस्वामीरायांची ‘स्मरणमात्रे’ भेट घडली त्यानंतर श्रीस्वामीसमर्थांच्या आज्ञेनुसार श्रीमहाराज अक्कलकोटहून सोलापुरमध्ये दाखल झाल्याचा उल्लेख ‘श्रीशंकरगीता’ या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायात आला आहे. श्रीमहाराजांचे आगमन सोलापूरच्या दक्षिण कसबा परिसरातील दत्तमंदिरानजीकच्या शुभराय मठामध्ये झाले. त्याआधी वाही वर्षांपूर्वी श्रीस्वामीसमर्थांचे सोलापुरातील आगमनही याच दत्तमंदिरात व शुभराय मठात झाले हा केवळ योगायोग नव्हता तर या दोन ‘सिद्ध’सत्पुरुषांमधील ‘समान’ दुवा होता.

चैतन्यस्वरूप ([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या