आशुतोष ब्रह्मचारी हल्ला प्रकरण – स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रीवा एक्सप्रेसमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात आशुतोष ब्रह्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांनी या कटामागे शंकराचार्यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. मात्र, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा हल्ला म्हणजे केवळ एक नाटक आणि आपल्याला बदनाम करण्याचे “षड्यंत्र” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी हे शंकराचार्यांविरुद्ध दाखल असलेल्या एका खटल्यात पुरावे देण्यासाठी प्रयागराज न्यायालयाकडे जात होते. पहाटे पाचच्या सुमारास रेल्वे फत्तेपूर आणि सिराथू स्टेशनच्या दरम्यान असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर वार केले असून त्यांचे नाक कापण्याचाही प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आशुतोष यांनी रक्ताबंबाळ अवस्थेत रेल्वेच्या स्वच्छतागृहात स्वतःला कोंडून घेतले. प्रयागराज स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

या घटनेवर भाष्य करताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा हल्ला पूर्णपणे बनावट असून स्वतःच्या बाजूने खटला मजबूत करण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेले हे एक पूर्वनियोजित नाटक आहे. आशुतोष ब्रह्मचारी यांनी यापूर्वी केलेले लैंगिक शोषणाचे आरोपही खोटे असून प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे शंकराचार्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास सत्य नक्कीच समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.