जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख शिवबंधनात

972

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडाख यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. नगर जिह्यात शिवसेना वाढीसाठी आपण झटणार असल्याचे आश्वासन गडाख यांनी या वेळी दिले.

शंकरराव गडाख यांनी 2019मधील विधानसभा निवडणूक नगर जिह्यातील नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षातून लढवली होती. अपक्ष म्हणून विजयी झाल्यावर दुसऱयाच दिवशी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या संदर्भात गडाख यांच्याशी चर्चाही केली होती. त्या वेळी त्यांनी शिवसेनेसोबत कायम राहीन, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले होते. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

शंकरराव गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव गडाख यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. नगर जिह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मातब्बर कुटुंब मानले जाते.

विश्वास सार्थ करेन!

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. आमदार झाल्यावर त्यांनी माझ्यावर विश्वास टाकत मंत्रीपदाची संधी दिली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण व समाजातील विविध घटकांसाठी चांगले निर्णय घेतले असून कोरोनाच्या संकट काळात मोठय़ा हिमतीने त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. शिवसेना नेहमीच शेतकरी, कष्टकरी व सामान्यांच्या सोबत असून शहरी व ग्रामीण भागात शिवसेनेचे मोठे काम असून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण झटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या