साहित्यरंगात शांता शेळके अन् वसंत बापट यांचे स्मरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे नुकताच साहित्यरंग महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये कवयित्री शांता शेळके आणि कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम सादर झाला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. वंदना कुळकर्णी यांनी ‘चतुरस्र शांताबाई’ या विषयावर बोलताना शांता शेळके यांच्या दीर्घकालीन साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकला, त्यांच्या लेखनाचे विविध पैलू फार सुंदर पद्धतीने उलगडून दाखवले. त्यानंतर ‘अनवट शांताबाई’ या कार्यक्रमातून कविता, गीते आणि ललित लेखनाचे सादरीकरण केले गेले.

दुसऱया दिवशी ‘रंग वसंताचे’ हा कवी वसंत बापट यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱयांनी सादर केले. यामध्ये बापट यांच्या कविता आणि गाणी सादर करण्यात आली. तिसऱया दिवशी शांता शेळके आणि वसंत बापट यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम ‘स्वरांजली’ बहारदार पद्धतीने सादर करण्यात आला. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते.