
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूरमध्ये मोठे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला दोनजण भेटले होते. विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागांची गॅरंटी त्यांनी दिली होती, असे विधान शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या विधानानंतर ते दोनजण कोण होते? आणि कशाच्या आधारावर त्यांनी 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली होती? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. तसेच शरद पवार यांचा रोख हा ईव्हीएम मशिनवर असल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशिन आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच भूमिकेवर विरोधी पक्षांकडून शंका आणि संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सर्वप्रथम म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच ईव्हीएम छेडछाडीचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी मतचोरीचा मुद्दा उचलून धरला आहे. अशातच शरद पवार यांच्या विधानाने देशभरात मोठा संशयकल्लोळ उडाला आहे.
शरद पवार नेमके काय म्हणाले?
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोठे विधान केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये दोन लोकांनी आपली भेट घेतली होती. विधानसभेच्या 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी त्यांनी दिली होती. निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत घालून दिली होती. आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचं ठरवलं आणि त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असे शरद पवार म्हणाले.