शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही – शरद पवार

साठ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी गेटवे ऑफ इंडियासमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला. समुद्राजवळ आणि अखंड वारा असतानाही आजपर्यंत कधी या पुतळ्याला धक्का बसला नाही. पण मालवणात काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे चित्र आज पाहायला लागत आहे. कारण या पुतळ्याच्या निर्मितीमध्येच भ्रष्टाचार झाला आहे. महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करण्याची बेशरमपणाची भूमिका घेणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही. यांचा निकाल तुम्हाला आम्हाला लावावा लागेल, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यासाठी स्वच्छ, चारित्र्यसंपन्न आणि लोकांच्या हिताची जपणूक करणाऱ्या नेतृत्वाची फळी महाराष्ट्रात निर्माण करण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सत्ता बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे परिवर्तन महाराष्ट्रात करायचे आहे. महाराष्ट्र प्रगत आणि यशस्वी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आणि आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू, असे पवार म्हणाले. कागलमधील एका व्यक्तीला सर्व काही दिले; पण संकटात साथ द्यायची जबाबदारी असताना ते सोडून गेले.  सात-आठ महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारमधील काही संस्थांनी ‘ईडी’सारख्या कारवाईतून चौकशी करून पुटुंबीयांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांच्या पुटुंबातील महिलांनी ‘आम्हाला गोळ्या घाला’ असे म्हणत संताप व्यक्त केला होता. आपल्या पुटुंबाला यातना देणाऱ्या घटकांच्या दरवाजातच लाचारासारखे ते जाऊन बसले. हा काही कागलचा इतिहास नाही. कागल बाकी काही सहन करेल; पण लाचारी स्वीकारणार नाही. ज्यांनी स्वीकारली त्यांना धडा शिकवायचे काम कागलची जनता करेल, असा इशारा शरद पवार यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता दिला.

समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीत

‘कोल्हापुरातील राजकारणाचे विद्यापीठ’, अशी ओळख असलेल्या कागलच्या गैबी चौकात सायंकाळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला. तसेच कागलमधून ज्यांना सर्वकाही दिले ते मंत्री मुश्रीफ हे अजित पवार गटात गेल्याने त्यांचा नामोल्लेख टाळून शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.