
सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. राज्यात काही काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन कारवाई करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महायुती सरकारचे कान टोचले.
बारामती येथे शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. बीड जिह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो, पण आजची जी बीडची अवस्था आहे तशी यापूर्वी केव्हाच नव्हती, पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम आपल्या गत काही महिन्यांत दिसून येत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
मटणाच्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेटबाबत पत्रकारांनी विचारले असता राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? हे काही राष्ट्रीय प्रश्न आहेत का? असे शरद पवार म्हणाले. जात आणि धर्म यातील अंतर कोणी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.



























































