
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असून त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.
अजित पवार गटाने शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्ष निवडीसाठी आमदारांची तातडीची बैठक विधान भवनात बोलविली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यावर त्या सायंकाळी 5 वाजता लोकभवन येथे छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शनिवारी सकाळी बारामती येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, मला माहिती नाही. मी याबाबत आज सकाळीच वाचले. सुनेत्रा पवार यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.
अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते आणि ते गेल्यावर आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने हा निर्णय घेतला असावा. पक्ष त्यांचा असून त्यांच्या पक्षाने जे काही ठरवले त्याची प्रचिती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी, बाकी राजकारण वेगळे, असेही शरद पवार यावेळी स्पष्ट म्हणाले. तसेच प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवले आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.































































