बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लोक फार काही बोलत नव्हते. त्यांनी नको त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले. पण मतदानाच्या वेळी इथले एकही गाव मागे राहिले नाही. त्यांनी शांतपणे बटण दाबले, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवार आज शिर्सुफळ गावच्या गावकऱयांशी संवाद साधला. गेल्या दोन दिवसापासून ते बारामती मतदारसंघातील दुष्काळी दौऱयावर आहेत. दौंड तालुक्यातील खोर, रोटी, हिंगणीगाडा या गावांमध्ये जाऊन गावकऱयांच्या भेटी घेतल्या. पवार म्हणाले, काही लोकांना वाटते की बारामतीत चमत्कार झाला, परंतु एवढी चर्चा व्हायचे कारण नाही, बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होण्याचे खरे कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. निवडणुकीत ज्या गोष्टी मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात त्या त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्या. त्यामुळेच या सगळय़ा गोष्टींची अधिक चर्चा झाली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मी आजवर अनेक निवडणुका लढलो आहे. खरंतर मी किती निवडणुका लढलो हे मला आठवतही नाही. सुरुवातीच्या काळात मी मते मागण्यासाठी तुमच्याकडे आलो, मात्र नंतरच्या काळात मी फक्त कामातून तुमच्या संपका&त राहिलो. मी मते मागायला आलो नाही, परंतु तुम्ही मतदान कधी चुकवले नाही. तुम्ही तुमचे काम चोख करत आला आहात. अजूनही करत आहात, असे पवार म्हणाले.
परिणाम निकालातून दिसला
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातला एक भाग आहे, जिथे जगभर काय काय चालले आहे त्याचे पोस्टर किंवा बोर्ड लावले जातात. तिथल्या एका बोर्डवर बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती. म्हणजे बघा बारामती कुठपर्यंत पोहोचली आहे. अगदी न्यूयॉर्कपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. याचा अर्थ लोकांचे निवडणुकीकडे लक्ष होते आणि त्याचा परिणाम निकालातून दिसून आला.