IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा एकत्रित पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारविरोधात आवाज उठवला आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या. यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही शरद पवारांनी दिला आहे. याबाबत शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 21, 2024
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असे शरद पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.