गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक, केला जोरदार पलटवार

6623

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे, असेही पडळकर म्हणाले. तसेच फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावायचे, आपल्या बाजूने करायचे आणि त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे, असेही पडळकर म्हणाले.

प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा असहाय्य प्रयत्न – आव्हाड
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जोरदार पलटवार केला आहे. शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवतोय, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न – मुंडे
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार यांच्यावर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो, असे ट्विट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

पडळकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे, युवक काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून आज बीडमध्ये युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमेला जोडे मारत आणि ती प्रतिमा जाळत आंदोलन केले. ‘मी देवेंद्र फडणवीस यांचा मुर्ख गुलाम’ अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावरील आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटोला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत शिरुर (कासार) येथे हे आंदोलन केले.

screenshot_2020-06-24-16-14-42-154_com-whatsapp

आपली प्रतिक्रिया द्या