लोकसभा निवडणुकीवेळी पिपाणीच्या अनुषंगाने चित्र स्पष्ट नव्हते. परंतु, आता विधानसभा निवडणुकीत ते चित्र अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ चिन्हामध्ये गफलत होणार नाही, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे व्यक्त केला.
कराड येथे आज पत्रकारांशी संवाद साधताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. आमच्या पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीवेळी ‘पिपाणी’ चिन्हामुळे नुकसान सोसावे लागल्याविषयी विचारले असता, चिन्हाच्या बाबतीत आता चित्र स्पष्ट झाले असून, विधानसभा निवडणुकीत ‘पिपाणी’चा कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही, अशी आपण अपेक्षा करूया, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यांचा ठाम निर्णय झाल्यानंतरच यावर बोलणे उचित होईल, असे उत्तर त्यांनी यासंदर्भातील प्रश्नावर दिले.
अजित पवार गटाच्या बबनदादा शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याबरोबरच अन्य कारणांसाठीही अनेकजण भेटायला येत असतात. त्यामुळे कुणी भेटायला आलं, तर आपण काय करणार, असा सवाल पवार यांनी केला. बबनदादा कित्येक वर्षं आमच्या सोबत आहेत. आमच्याच विचाराने ते आमदार झालेत. त्यांनी जी भूमिका घेतली होती, त्यामुळे जनतेत नाराजी होती. परंतु, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी, आमच्यातला सलोखा काही संपत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरन्यायाधीशांनी घेतलेला निर्णय योग्यच!
n सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विचारले असता, न्याय देवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, न्याय देवतेच्या हातात तराजूऐवजी संविधान देण्यात आल्याची बाबही चांगली आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून देशात असा निर्णय कधीच झाला नसता, तो त्यांनी घेतला आहे, असेही पवार यांनी सांगितले.
तरुण चेहऱयांना संधी देणार – जयंत पाटील
n जयंत पाटील म्हणाले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी आहे. तसेच बाहेरील पक्षातून आमच्याकडे येणाऱयांची संख्या जास्त आहे. परंतु, आमच्याकडे अनेक चांगले तरुण चेहरे असून, त्यांना आम्ही प्राधान्याने संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.