1972 पेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण;शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रात यंदा पडलेला दुष्काळ हा 1972 पेक्षाही भीषण आहे. 1972 तसेच 1978 सालचा दुष्काळ मी पाहिला आहे. तेव्हा पाणी होते पण पीक गेले होते, मात्र लोकांना पाणी हवे आहे. त्यामुळे सरकारकडून पाण्याचे नियोजन योग्य रीतीने करण्यात यावे. त्याचप्रमाणे चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम तसेच या भागांमध्ये अन्नधान्याचे नियोजनही योग्य रीतीने व्हायला हवे अशा उपाययोजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सुचवल्या.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या उशिरा दिल्या गेल्याचा प्रश्न उपस्थित केला.त्याचवेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा अनुदानात वाढ करून प्रत्येक जनावरामागे 100 रुपये देण्याची घोषणा केली.

जायकवाडीचे पाणी मराठवाडय़ाला देण्याबाबत निकालानंतर निर्णय

जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाडय़ाला सध्या देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल असे शरद पवारांनी सुचवल्यावर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवून घेतो असे सांगत सकारात्मकता दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी 23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर यासंदर्भात केंद्राकडे अधिक मदत मागू असे आश्वासनही दिले.