केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शरद पवार यांनी तूर्तास ही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. झेड प्लस आधी मला कोणता धोका आहे ते बघतो, नंतर काय ते ठरवू, असे त्यांनी संबंधित अधिकाऱयांना सांगितले.
शरद पवारांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते. त्यांनी शरद पवार यांना सध्या असलेल्या वाय दर्जाची सुरक्षा वाढवून ती झेड प्लस करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शरद पवार म्हणाले, मी स्वतः आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का ते पडताळून पाहीन. त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण गुप्त ठेवण्यात आलं आहे. त्यावर शरद पवार यांनी कोणत्या अशा गोष्टींमुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होईल असे वाटते त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबीची यादी देण्याची मागणी केली. नव्या सुरक्षा व्यवस्थेतील अटी मान्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. याआधीसुद्धा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली होती.
घराच्या आतमध्ये सुरक्षाकडे नको
गृहमंत्रालयाकडून शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवार यांना करण्यात आला आहे. मात्र, घराच्या आतमध्ये सुरक्षाकडे नको, अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे.