सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालयाची उभारणी करावी – खासदार शरद पवार

562

सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची उभारणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यातील साखर कारखान्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कराडमध्ये सातारा-कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोरोनाचे संकट पूर्ण जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहेत. पण सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एखाद्या छोट्या अद्ययावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, आपले राज्य नक्की कोरोनामुक्त होईल, असा विश्वास शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या