दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत 4 महिन्यांपासून चर्चा, 12 तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता! – शरद पवार

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतही माहिती दिली.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. सगळी चर्चा या लोकांनी केले होती आणि निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. पण दुर्दैवाने या अपघाताने यात खंड पडल्याचे चित्र दिसत आहे.

आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होते. विलीनीकरणाबाबतही गेले 4 महिने चर्चा सुरू होती. 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता. पण दुर्दैवाने हा अपघात झाला, असे शरद पवार म्हणाले.

दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद वाढावा राहावा यासाठी चर्चा सुरू होती. ती चर्चा सकारात्मक दिशेने होती. पण अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे याला धक्का बसला, असे शरद पवार म्हणाले. तसेच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढेही सुरू राहील का याबाबत आपल्याला माहित नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे, असे म्हणत शरद पवारांनी विलीनीकरणाला हिरवा कंदील दाखवला.

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, शरद पवार यांचे मोठे विधान