शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार – शरद पवार

अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. सध्या राज्य सरकारलाही मदत देण्यात मर्यादा येत आहेत. या संकटात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राने मदत केली पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी रविवारी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

तुळजापूर येथे हेलिकॉप्टरने रविवारी सकाळी 9.30 वाजता शरद पवार यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी काक्रंबा, काक्रंबावाडी, लोहारा, सास्तूर, राजेगाव त्यानंतर उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतीची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्याबरोबरच राज्यात अनेक जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शक्य तितक्या लवकर मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारला मदत करण्यासाठी काही मर्यादा येत आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीतील खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या