Share market crash : शेअर बाजार धडाम; निर्देशांकात 2500 अंकांची घसरण, 10 लाख कोटी स्वाहा!

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार धडाम झाला आहे. सोमवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 2500 हून अधिक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 750 अंकांनी पडला. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकादारांच्या 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बातमी लिहीपर्यंत सेन्सेक्स 2442 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी 730 अंकांनी घसरला होता. विक्रीचा सपाटा सुरू झाल्यास बाजारात आणखी पडझड पहायला मिळण्याची शक्यता आहे.

निफ्टी फिफ्टीमधील टाटा मोटर्स हा शेअर सर्वाधिक 4.33 अंकांनी पडला. त्यासह हिंडाल्को 4.04 टक्के, ओएनजीसी 3.88 टक्के, श्रीराम फायनान्स 3.47 टक्के आणि जेएसडब्ल्यू स्टील 3.27 टक्क्यांनी पडला. या सर्व पडझडीमध्येही ब्रिटानियाचा शेअर 2.18 टक्के, सन फार्मा 1.30 टक्के आणि हिंदुस्थानी युनीलिव्हर 1.17 टक्क्यांनी वधारला.

एएसईने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आज जवळपास 35 शेअरला अप्पर सर्किट लागले असून तब्बल 198 शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत. फ्यचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि शॉर्ट टर्मसाठी शेअर घेतलेल्या अनेक गुंतवणूकदारांना या घसरणीचा फटका बसला आहे.

अमेरिकेमध्ये मंदिची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे जागतिक बाजारातही ‘ब्लड बाथ’ पहायला मिळाला. याचाच परिणाम हिंदुस्थानच्या मार्केटमध्येही झाला आणि बाजार उघडताच विक्रीचा सपाटा सुरू झाला. यामुळे बाजार कोसळला.

दरम्यान, याआधी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजार कोसळला होता. सेन्सेक्समध्ये 885.59 अंकांची घसरण होऊन तो 80981.95 वर बंद झाला, तर निफ्टी 293.20 अंकानी घसरून 24717.70 वर पोहोचला होता. घसरणीचा हा सिलसिला सोमवारीही पहायला मिळाला.